|| नमिता धुरी

जाहिरातींचा ओघ कमी; तरीही चांगल्या विक्रीची आशा

मुंबई :  गतवर्षीच्या टाळेबंदीमुळे एकूणच प्रकाशन व्यवसायाला आलेली मरगळ दूर सारत पुन्हा एकदा दिवाळी अंक बाजारात येत आहेत. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतरही जाहिरातींचा ओघ कमीच असल्याने या व्यवसायात आर्थिक ओढाताण सुरू असली तरीही यंदा निर्बंध शिथिल झाल्याने चांगल्या विक्रीची आशा प्रकाशकांना आहे.

गतवर्षी कठोर टाळेबंदीमुळे काही दिवाळी अंक बंद पडले, काही अंक छापले जाऊनही वाचकांपर्यंत ते पोहोचण्यात अनेक अडचणी आल्या, दुसऱ्या बाजूला काही प्रकाशकांनी ऑनलाइन अंकही उपलब्ध करून दिले. विक्री कमी होण्याच्या भीतीने प्रकाशकांनी कमी प्रती बाजारात आणल्या होत्या. त्यामुळे दिवाळी अंकांच्या बाजारातील व्यवस्था विस्कळीत झाली होती.

यंदा मात्र चित्र वेगळे आहे. काही प्रकाशकांनी एकत्र येऊन विविध दिवाळी अंकांचा संच सवलतीत उपलब्ध करून दिला आहे, तर काहींनी अंकाच्या जाहिरातीसाठी समाजमाध्यमांचा आणि ऑनलाइन विक्री संकेतस्थळांचा वापर सुरू केला आहे.

‘गतवर्षी अडीचशे ते ३०० रुपये किमतीचे दीडशे अंक बाजारात होते. प्रत्येक अंकाच्या साधारण तीन हजार प्रती विकल्या गेल्या. त्यामुळे यंदा जाहिराती कमी मिळाल्या असल्या तरीही दुप्पट विक्रीची आशा आहे,’ असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले. ‘शासनाच्या जाहिराती, पर्यटनासारखे व्यवसाय अद्याप सुरू झालेले नाहीत. बँका आणि बांधकाम उद्योगांच्या जाहिराती काही प्रमाणात आहेत. परंतु दिवाळी अंकांची शतकानुशतकांची परंपरा सुरू ठेवायची आहे. गतवर्षी विक्रेत्यांमध्ये बरीच उदासीनता होती; तुलनेने या वर्षी समाधानकारक मागणी आहे,’ अशी माहिती ‘किस्त्रीम’चे विजय लेले यांनी दिली.

किमतीत वाढ

एखादा अंक वर्षभर ज्या किमतीत निघतो त्याच्या केवळ दुप्पट किमतीतच दिवाळी अंक काढण्याचा नियम टपालाच्या माध्यमातून अंक पाठवणाऱ्याना पाळावा लागतो. त्यामुळे किंमत ठरावीक मर्यादेच्या पलीकडे वाढवता येत नाही. यावर उपाय म्हणून टपालाने पाठवलेल्या अंकांची किंमत कमी आणि विक्रेत्यांकडील अंकांची किं मत जास्त असे मार्ग काही प्रकाशक अवलंबत असल्याची माहिती ‘जडणघडण’चे डॉ. सागर देशपांडे यांनी दिली. कागद आणि छपाईचा खर्च वाढला आहे. मिळणाऱ्या जाहिरातीही कमी किमतीत मिळत असल्याने काही अंकांची पृष्ठसंख्या कमी करावी लागली आहे. ‘आतापर्यंत ५०-६० अंक बाजारात आले आहेत. आणखी २०० येतील; मात्र २० टक्के किममी वाढल्या आहेत,’ असे दिवाळी अंकांचे वितरक ‘आयडियल’चे मंदार नेरुरकर यांनी सांगितले.

अर्थकारण…

काही दिवाळी अंकांना दैनिकांचे पाठबळ असल्याने जाहिरातीसाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ असते. केवळ हौस म्हणून काढल्या जाणाऱ्या दिवाळी अंकांना वैयक्तिक संपर्कातून जाहिराती मिळतात; मात्र ज्या दिवाळी अंकांकडे वाचनसंस्कृती आणि वैचारिक जाण रुजवण्याची शतकी परंपरा आहे अशा अंकांकडे जाहिरातबाजीसाठी पुरेसे मनुष्यबळ, पैसा या गोष्टी कमी प्रमाणात असतात. शासनाच्या, बांधकाम व्यवसायाच्या, बँकांच्या जाहिरातींवर हे अंक अवलंबून असतात. वर्षभर नियतकालिक काढून त्याचाच विशेषांक दिवाळीला काढल्यास त्यांच्याकडे नियमित असा बांधील वाचकवर्ग असतो. याउलट, जे विशेषांक केवळ दिवाळीत निघतात त्यांच्या संपादक मंडळाला पदरमोड करून अंक वाचकांपर्यंत पोहोचवावा लागतो.