मुंबई :  सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केल्यावर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तरी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देणारे पत्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली होती. या आदेशानुसारच भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी आतापर्यंत २८ हजार मनसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. हजारोंना तडीपार केले आहे. अनेकांना तुरुंगात टाकायला सुरुवात केली आहे. हे सारे ध्वनिप्रदूषण करणारे आणि लोकांना मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविले जाऊ नयेत म्हणून सुरू आहे.   महाराष्ट्र सैनिकांना दडपण्यासाठी राज्य सरकार गेले आठवडाभर ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करीत आहे ते पाहता, मशिदींमध्ये तपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी सरकार किंवा पोलिसांनी अशी धरपकड मोहीम कधी राबविली होती का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदुजन उघडय़ा डोळय़ांनी बघत आहेत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.