सामाजिक व सांस्कृतिक विचारधन अधिक श्रीमंत करणाऱ्या ज्ञानोपासक विदूषी, ज्येष्ठ साहित्यिक दुर्गाबाई भागवत यांचा आणि मुंबईतील जगविख्यात एशियाटिक सोसायटीचा ऋणानुबंध अगदी अतूट असा. ते जणू त्यांचे दुसरे घरच. सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये बसून दुर्गाबाईंनी आपले बरेचसे लेखन-संशोधन कार्य केले. या भावबंधाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आता त्याच दरबार हॉलमध्ये दुर्गाबाईंचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर यांनी हे राजसी तैलचित्र साकारले असून, येत्या २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता त्याचे अनावरण खास समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.     
दुर्गाबाई आणि एशियाटिक सोसायटी यांचे जिव्हाळ्याचे नाते पाहता या वास्तूत तैलचित्राच्या माध्यमातून त्यांची स्मृती जपणे हे अधिक औचित्यपूर्ण आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने एशियाटिक सोसायटीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी या वास्तूत दुर्गाबाई भागवत यांच्यावर कायमस्वरूपी काहीतरी करावे, अशी सूचना आली होती. त्यावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर आणि कार्यकारी समिती यांनी ‘दुर्गाबाई भागवत स्मृती व्याख्यान’ सुरू करण्याचे ठरविले. खरे तर त्याच वेळी त्यांचे तैलचित्र बसविण्याची कल्पना पुढे आली होती. दरम्यानच्या काळात दरबार हॉलच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे तेव्हा ते चित्र बसविता आले नाही. आता ते पूर्ण झाल्याने हे तैलचित्र बसविण्यात येणार असल्याचे एशियाटिक सोसायटीच्या माजी मानद सचिव आणि दुर्गाबाई भागवत यांच्या साहित्याच्या अभ्यासिका डॉ. मीना वैशंपायन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  
अनावरणानिमित्त खास कार्यक्रम

व्यक्तिचित्र असे आहे..
दुर्गाबाईंचे व्यक्तिचित्र करणारे चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगितले की, हे चित्र ‘लाइफ साइज’ या प्रकारातील असून. चार फूट उंच व तीन फूट रुंद कॅनव्हासवर, पुस्तकांच्या पसाऱ्यात लाल साडी नेसून बसलेल्या दुर्गाबाईंची प्रतिमा आणि मागे त्यांच्य आवडत्या सरस्वतीचे चित्र असलेला टेबललॅम्प आहे. दुर्गाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक वैशिष्टय़े होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करारीपणा असला तरी त्यांच्यात सहृदयता, व्यासंग, विद्वत्ता, ठाम निश्चय असेही पैलू होते. हे सर्व पैलू साकार होतील, असा प्रयत्न आपण हे चित्र रेखाटताना केला असल्याचेही बहुलकर म्हणाले.