मुंबई : सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे देशद्रोह अथवा बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादी कृत्य होत नाही, असा दावा शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेल्या रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांनी जामिनाची मागणी करताना विशेष न्यायालयात केला.

डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी एल्गार परिषदेत केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे कोरेगाव भीमा येथे दंगल उसळल्याच्या आरोपाअंतर्गत त्यांना २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. दोघांनी जामिनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. दोघेही कबीर कला मंच या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांतून या दोघांविरोधात आरोप सिद्ध करण्यात एनआयएला सकृद्दर्शनी अपयश आले आहे. एल्गार परिषदेत या दोघांनी पेशवाई विरुद्ध लोकशाही हे नाटय़ सादर केले होते. त्यांच्या या नाटय़ाचे संवाद दोन समाजांतील शांतता भंग करणारे होते, असा एनआयएचा आरोप आहे.