आरोपी शिक्षकांची जामिनावर सुटका
वडय़ाळ्यातील जे. के. नॉलेज ट्रस्टच्या मुंबई विद्यालयात गेल्या वर्षभरापासून गैरप्रकार सुरू असून विद्यार्थिनींनी शिक्षक तसेच व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात होता ही गंभीर बाब आहे. कोणीही दखल घेत नव्हते. तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत होते. परंतु, मनसेच्या पुढाकाराने याबाबत कारवाई करण्यात आल्याचा दावा मनसे महिला उपाध्यक्ष रिटा गुप्ता यांनी केला आहे. शाळेतील या सर्व गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणीही गुप्ता यांनी केली आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विनयभंग झालेल्या ११ पीडित विद्यार्थिनींनी तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर मदन कोळकर, दीपक आवारे, किशोर बरगडे या तीन शिक्षकांना अटक करण्यात आली होती. याबाबत बोलताना वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग इंदूलकर म्हणाले की, तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका झाली. आणखी विद्यार्थिनी तक्रारीसाठी पुढे आलेल्या नाहीत.