फेसबुक हे संपर्काबरोबरच मनोरंजनाचे माध्यम. एरवी त्यावर स्वत:चे फोटो, गाणी, करमणुकीचे व्हिडिओ, फिल्मी गॉसिप, विनोद, गमतीचे छायाचित्रे अपलोड केली जातात. परंतु बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त शनिवारी संध्याकाळी आल्यापासून फेसबूकवर केवळ बाळासाहेबांच्या श्रद्धांजलीचा मजकूरच अपलोड केला जात होता. बाळासाहेबांबद्दलच्या भावना अनेक प्रकारे नेटीझन्सनी व्यक्त केल्या. परिणामी फेसबक एकप्रकारे शोकबुक बनल्याचे दिसत होते. रविवारी दिवसभर बाळासाहेबांना फेसबुकवर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती. कल्पक चित्रे, व्यंगचित्रे,बाळासाहेबांच्या छायाचित्रांचा आधार घेत अनेकांनी आपल्या भावना ‘शेअर’ केल्या. ‘२०१२’मध्ये जग नष्ट होणार आहे, ते का म्हटले जायचे ते आता बाळासाहेबांच्या जाण्याने समजलं, अशा भावना एका चित्राद्वारे व्यक्त करण्यात आली.
‘आता स्वर्गातही भगवा फडकणार’, ‘रडायचं नाय.लढायचं.मी कुठे गेलेलो नाही’, ‘श्वासांची माळ तुटली, ध्यासांची कधीच नाही’ अशा शब्दांतील भावना बाळासाहेबांच्या चित्राद्वारे व्यक्त करण्यात येत होत्या. तर ‘आता ही मराठी लेकरे कुणाकडे पाहणार’  अशी चिंता एका चित्राद्वारे व्यक्त करण्यात आली होती.