* मुलुंड ऑनलाइन गंडा
* रक्कम काढू देणाऱ्या बँकांवर पोलिसांचा संशय

मुलुंड येथील एका सौंदर्यप्रसाधन कंपनीचे संचालक अंकुर कोराने यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी त्याचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही. यासाठी मुंबईसह उत्तर प्रदेशात जी बनावट कागदपत्रांच्या आधारे १२ खाती उघडण्यात आली त्या खातेदारांचा फक्त १० टक्के दलालीपुरताच संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक कोटीपैकी ४३ लाख रुपये काढून घेण्यात आरोपींना यश आले असले तरी बँकांनी एकावेळी चार ते १० लाखांची रक्कम कशी काढू दिली, असा प्रश्न पोलिसांना सतावत आह़े त्यामुळे संशयाची सुई बँकेतील रोखपाल वा व्यवस्थापकाकडे वळली आहे.
वसई येथील बँकेत ट्राय परेरा याच्या खात्यावर ३० लाख रुपये हस्तांतरीत झाल्यानंतर त्याने एटीएममध्ये जाऊन २० हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी ३० लाख जमा झाल्याचे दिसू लागल्यानंतर दहा लाख रुपये काढण्यासाठी त्याने बँकेला धनादेश दिला. तोपर्यंत बँकेने पोलिसांना कळविल्यामुळे परेरा हाती लागला. परेराला ही रक्कम काढल्यानंतर एक लाख रुपये दलाली मिळणार होती. उर्वरित नऊ लाख रुपये बँकेबाहेर गाडीत हजर असलेल्या दोघा इसमांकडे सुपूर्द करायचे होते. परंतु पोलिसांची कारवाई झाल्यानंतर ते पसार झाले. यापैकी एक परेराचा मित्र असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. हवालापोटी काही रक्कम परदेशातून येणार असल्याची माहिती परेराला त्याच्या मित्राने दिली होती. त्यासाठी त्याचे खाते बनावट कागदपत्रांच्या नावे उघडण्यात आले होते.
४३ लाखांची रक्कम काही तासांत काढून घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील चारही बँकांतून मोठय़ा प्रमाणात रक्कम काढण्यात आली आहे. त्यापैकी मीरा रोड येथील खात्यात चार लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी तीन लाख ९९ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्याबाबतचा तपशीलही पोलिसांना मिळाला असून त्यांचा शोध जारी करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक जिवाजी जाधव, साहाय्यक निरीक्षक दिलीप दामुनसे आदींचे पथक या प्रकरणी तपास करीत आहे.