मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल बुधवारी चौकशी समितीने पालिकेचे नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर केला.

मात्र प्राथमिक अहवालात ठपका ठेवण्यात आलेले अभियंते वगळता अन्य कोणाच्याही नावांचा अंतिम अहवालात उल्लेख नसल्याचे समजते. तथापि, प्राथमिक अहवालात ठपका ठेवलेल्या अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

पालिकेने मुंबईमधील पादचारी पूल, उड्डाणपुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेत तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली होती. मात्र सुस्थितीत असल्याचा उल्लेख करीत अहवालात किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आलेला हिमालय पूल कोसळल्यामुळे तांत्रिक सल्लागारांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी मुंबईमधील सर्वच पुलांची फेरतपासणी करण्याचे आदेश तांत्रिक सल्लागारांना दिले होते. तसेच हिमालय पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (दक्षता) विवेक मोरे यांना दिले होते. मोरे यांनी या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल २४ तासांच्या आत पालिका आयुक्तांना सादर केला होता. या अहवालात अभियंता अनिल पाटील आणि संदीप काकुळते यांच्यासह अन्य काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. पाटील आणि काकुळते यांना निलंबित करून अटकही करण्यात आली. त्यानंतर पूल विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांनाही अटक करण्यात आली. अभियंत्यांना झालेल्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर पालिकेतील अभियंत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र प्रवीण परदेशी यांनी या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन अभियंत्यांच्या संघटनेला दिल्यानंतर आंदोलन रद्द करण्यात आले.