मुंबई: खार पश्चिम परिसरातील गुरू गणेश्वर मार्ग येथील ‘नॉथन व्हीला’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या चार रहिवाशांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली.
खार पश्चिम गुरू गणेश्वर मार्गावरील सात मजली ‘नॉथन व्हीला’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनाचे काम सुरू असतानाच अचानक आगीची तीव्रता वाढली आणि १० वाजून ५२ मिनिटांनी आग श्रेणी २ क्रमांकाची असल्याचे जाहीर करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ बंब, चार पाण्याचे मोठे टँकर, तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या चार रहिवाशांची सुखरूप सुटका केली. दुपारी १ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.