मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावतीमधील जाहीर सभेत बोलताना ‘इंडियाबुल्स’च्या प्रकल्पाला शेतीसाठीचे पाणी दिले जात असल्याची टीका केल्यानंतर लागलीच त्याचे पडसाद मुंबईत उमटले. परळ भागात असणाऱ्या इंडियाबुल्सच्या कार्यालयावर रविवारी रात्री उशिरा काही तरुणांनी हल्ला केला. दगड आणि लोखंडी सळ्या घेतलेल्या सुमारे १५ जणांनी या कार्यालयाच्या सुरक्षारक्षकाच्या चौकीवर हल्ला करून चौकीच्या काचा फोडल्या. या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलीये. सीसीटीव्ही चित्रफितीच्या माध्यमातून पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. आरोपींना सोमवारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्य़ातला अप्पर वर्धा प्रकल्प ३०३ कोटी रुपयांचा होता, तो १३७५ कोटींवर पोहोचला, तरीही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पाचे पाणी इंडियाबुल्स कंपनीच्या वीज प्रकल्पाला दिले जात आहे. सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी अशा प्रकल्पांना देऊ नये. अशा प्रकल्पांची गरज नाही, त्यासाठी उद्यापासून आंदोलन झाले पाहिजे, अशी हाक राज ठाकरे यांनी अमरावतीच्या जाहीर सभेत दिली होती.