मुंबईः अभिनेता रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘जेलर’सह ‘शहीद’ आणि ‘पुष्पा – २’ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देण्याची बतावणी करून अंधेरीतील एका ३२ वर्षांच्या अभिनेत्रीची सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मॉडेलच्या आईच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी दोन तोतया कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध  बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पियुष जैन आणि समीर अशी या दोघांची नावे आहेत.

अंधेरीतील चार बंगला परिसरात वास्तव्याला असलेल्या महिलेचा खाद्यपदार्थ पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांची ३२ वर्षांची मुलगी मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने ‘कसम’, ‘आहाट’, ‘क्राईम पेट्रोल’ आदी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे इन्स्टाग्रामवर एक खाते आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक संदेश आला होता. त्यात तिला रजनीकांतचा बहुचर्चित सिनेमा ‘जेलर’मध्ये काम करण्याची संधी असून तिला ऑडिशनसाठी बोलाविण्यात आले होते.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

रजनीकांतसोबत एका महिला आणि पुरुषांची पोलीस अधिकार्‍यांची मुख्य भूमिका असून महिला पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेसाठी तिला प्रस्ताव देण्यात आला.  त्यानंतर तिने संबंधित व्यक्तीला दूरध्वनी केला. यावेळी या व्यक्तीने तो पियुष जैन असल्याचे सांगितले. आपण ‘जेलर’ सिनेमाचा कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून त्याने तिला पोलीस गणवेशातील एक छायाचित्र पाठविण्यास सांगितले. रजनीकांतसोबत मुख्य भूमिका करायला मिळत असल्यामुळे ती प्रचंड आनंदात होती. त्यानंतर तिने पोलीस गणवेशातील काही छायाचित्रे काढून पियुष जैनला पाठविली होती. पियुषने तिला ‘जेलर’सह इतर चित्रपटातही चांगली भूमिका देण्याचे आश्‍वासन दिले होते. कास्टिंग डायरेक्टर समीरला ‘शहीद’ चित्रपटासाठी एका मुख्य अभिनेत्रीची गरज असून या चित्रपटासाठी  तिची शिफारस करणार असल्याचे पियुषने तिला सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : जी२० चे उद्घाटन माझ्या हाताने झालं, स्वत:ला भाग्यशाली समजतो; नारायण राणे

इतकेच नव्हे तर समीरने तिचे छायाचित्र पाहिल्यानंतर तीच ‘शहीद’ चित्रपटासाठी योग्य अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. ऑगस्ट २०२२ रोजी या दोघांनी तिला सिने टीव्ही ऑफ आर्टिस्ट कार्ड आणि फिजिकल कार्ड यांच्या प्रती कुरिअरद्वारे पाठवल्या. याचदरम्यान त्यांनी ‘जेलर’ चित्रपटासाठी तिला काम देण्यासाठी एक करारपत्र आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या चित्रीकरणासाठी तिच्या व्हिसासंदर्भातील दस्तावेज पाठवून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीत तिच्यासह आईचे दुबईमार्गे पॅरिस येथे जाण्यासाठी विमानाचे तिकिट पाठविले होते. १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान चित्रीकरण असल्याने त्यांचे विमान तिकीट, लॉजसह ‘जेलर’, ‘शहीद’ आणि ‘पुष्पा – २’साठी कायदेशिर कंत्राट, क्लिअरन्स ऑफ बँक सर्टिफिकेट, करमणूक कर, जीएसटी, इंन्स्टाग्राम व्हेरिफिकेशन, विकिपीडिया आणि गुगल या समाज माध्यमांवर तिचे नाव प्रसारित करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिच्या आईने जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पियुष जैन आणि समीर यांना अनुक्रमे साडेआठ लाख रुपये ऑनलाईनद्वारे हस्तांतरित केले होते.

लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगून या दोघांनी त्यांचे पॅरिसचे तिकिट रद्द केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी चित्रीकरणाचा कालावधी वाढला असून नवीन तिकिट पाठविले जाईल असे त्यांना सांगण्यात आले.  त्यानंतर पियुषने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘जेलर’चे पोस्टर अपलोड केले होते. ते पोस्टर पाहिल्यानंतर तिला प्रणव नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करुन ते पोस्टर तातडीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काढून टाकण्यास सांगितले. यावेळी तिने पियुष आणि समीर यांनीच ते पोस्टर अपलोड केले असून तिला ‘जेलर’ चित्रपटात भूमिका दिल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर प्रणवने तिला तो ‘जेलर’ चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक असून त्यांच्याकडे पियुष जैन नावाचा कोणीही व्यक्ती कास्टिंग डायरेक्टर नसल्याचे त्याने सांगितले. ही माहिती ऐकून या महिलेसह तिच्या मुलीला धक्काच बसला. फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच अभिनेत्रीच्या आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तेथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पियुष जैन आणि समीर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.