राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेले आणि अनेक गावांचा सक्रीय पाठिंबा लाभलेले ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे उपसचिव रुचेश जयवंशी यांनी परिपत्रक काढून हे अभियान स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये स्वच्छता अभियान राबवत असताना उदंड प्रतिसाद मिळालेले ग्राम स्वच्छता अभियान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१४-१५ मधील जिल्हा व विभागस्तरीय तपासणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील ही प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून हे अभियान स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गेल्या शनिवारी या संदर्भातील शासकीय आदेश जारी करण्यात आला.
आर. आर. पाटील राज्याच्या ग्राम विकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत विविध ग्राम पंचायतींना पुरस्कारही देण्यात येत होते. राज्यातील विविध ग्राम पंचायतींनी या अभिनायामध्ये सक्रीय सहभाग घेऊन गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले होते.



