मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांना या आठवड्याच्या सुरुवातीपासून विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. एकीकडे उष्णतेचा दाह आणि दुसरीकडे लोकल खोळंबा होत असल्याने, प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे लागत आहे.
शुक्रवारी हार्बर मार्गावर विसंबून असलेल्या प्रवाशांना रद्द झालेल्या लोकल आणि लोकलचा २० ते ३० मिनिटांचा लेटलतीफ कारभाराचा फटका बसला. सोमवारी, २९ एप्रिल रोजी हार्बर मार्गावरील सीएसएमटीच्या फलाट क्रमांक २ नजिक लोकल घसरली. त्यानंतर बुधवारीही या घटनेची पुनरावृत्ती झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून मध्य रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव रुळावरून घसरलेल्या ठिकाणावर ताशी १० किमी वेगमर्यादा लागू करण्यात आली. त्यामुळे १४ लोकल रद्द आणि शेकडो लोकल उशिराने धावल्या. तर, शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत दुर्घटनास्थळी ताशी १० किमी वेगाचे निर्बंध लादण्यात आल्याने लोकल सेवा विलंबाने धावू लागली. त्यामुळे लोकल सेवा ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यानंतर ताशी २० किमी वेगाने लोकलचा वेग वाढवण्यात आला. परंतु, लोकल रुळावरून घसरेल्या ठिकाणी तीव्र वक्रामुळे येथे सावधपणे लोकल चालवण्यात येत होती.
हेही वाचा – मुंबईत शनिवार, रविवारी असह्य उकाडा
हार्बर मार्गावरील वेगमर्यादेमुळे ७ अप आणि १२ डाऊन अशा १९ लोकल रद्द करण्यात आल्या. लोकलमध्ये, स्थानकात वारंवार उद्घोषणा होत नसल्याने, पुढील प्रवासाचे नियोजन करणे अशक्य होते, असे वडाळा येथील प्रवाशाने सांगितले. तर, लोकलच्या वेगमर्यादेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे, परंतु, त्यावरील उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक आहे, असे रे रोड येथील प्रवाशाने सांगितले.
हेही वाचा – ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या
सकाळी बराच वेळ वडाळा आणि शिवडीदरम्यान लोकल ३० मिनिटे थांबली होती. त्यामुळे कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला, असे सानपाडा येथील प्रवाशाने सांगितले. दरम्यान, सीएसएमटी येथील वेगमर्यादा हळूहळू ताशी ३० किमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात अनेक आव्हानात्मक कामे करणे गरजेचे असून, ती करण्याचे प्रयत्ने सुरू आहेत, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.