मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ए. बी. नायर मार्गावरील जुहू टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गॅसगळतीमुळे काही दुकानांना आग लागली. या दुर्घटनेत एकूण चारजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनाग्रस्त परिसरातील महानगर गॅस कंपनीच्या गॅस वहिनीतून शुक्रवारी अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे दोन ते तीन दुकानांमध्ये आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. अग्निशामकांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी आग विझविण्यात यश आले.

हेही वाचा…गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून हत्या

या दुर्घटनेत नरसिंह फगिल्ला (५०), वाझिर हुसेन (३०), शांतीलाल चौधरी (२४), आसिफ हुसेन (३०) हे चौघे जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.