चांगल्या वागणुकीमुळे आजवर सोडण्यात आलेल्या कैद्यांची यादी राज्य सरकार नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या यादीची मागणी केलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांला राज्यातील ४३ तुरूंगांची यादी सरकारकडून पाठवण्यात आली असून प्रत्येक तुरूंग प्रशासनाकडून अशा कैद्यांबद्दल माहिती मागवावी अशी सूचनाही करण्यात आली.
तुरूंगवासादरम्यान वर्तणूक चांगली ठेवल्याबद्दल संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत किती कैद्याची शिक्षा कमी केली, किती कैद्यांनी शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज केला आणि काही अर्जावर कार्यवाही न करण्याची कोणती कारणे आहेत अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते मन्सूर दर्वेश यांनी शासनाच्या कायदा व न्याय विभागाकडे मागवली होती. राज्यात मोठय़ा संख्येने तुरूंग असून चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षा कमी केलेल्या कैद्यांची माहिती ठेवण्याची शासनाकडे कोणतीही तरतूद नाही. मात्र, ही माहिती संबंधित तुरूंगाकडे निश्चित उपलब्ध होऊ शकेल असे उत्तर तुरूंग प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.
अतिरिक्त महासंचालकांकडून आलेल्या पत्रात अशा कैद्यांची माहिती साठवून ठेवलेली नसल्याने ती आमच्याकडे उपलब्ध नाही असे उत्तर नमूद करण्यात आले. या पत्रासोबत राज्यातील ४३ तुरूंगांची यादी देण्यात आली असून त्यांच्याकडे योग्य माहिती मिळू शकेल असे स्पष्ट करण्यात आले.