मुंबई: मुंबईतील पावसाळ्यास तोंड देण्यास रेल्वे प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. मुंबईकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी रेल्वेने घेतली पाहिजे, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केल्या.

बुधवारी पावसाच्या पहिल्याच दिवशी उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली.  रेल्वे सेवा दहा तासांहून अधिक वेळ ठप्पच झाली. यानंतर गुरुवारी रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वेच्या पावसाळी कामांचा आढावा घेतला.  मुंबईतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. रेल्वेच्या तांत्रिक व नागरी कामांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांशीही भागीदारी करण्याचा सल्ला यावेळी गोयल यांनी दिला. रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी कठोर परिश्रम व प्रयत्न के ले पाहिजेत. त्यासाठी नेहमी तयार राहण्याची सूचना त्यांनी के ली. बैठकीला उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी करोनाकाळातही केलेल्या पावसाळापूर्व कामांची माहिती यावेळी दिली.