परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडच्या शास्त्रीनगर भागात एका इमारतीची भिंत कोसळून १७ वर्षाच्या युवकाचा भिंतीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

मुसळधार पाऊस पडत असतानाच मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात एका घरावर अचानक भिंत कोसळली. यात एका युवकाचा भिंतीखाली चिरडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे ११ जण जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ व पाऊस असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. टेकडीजवळ असल्याने ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलुंड परिसरात भिंत कोसळून जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. येत्या काही तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शुक्रवारी सांयकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे.  दक्षिण मुंबईतील ‘डी’ प्रभागात १५ मिनिटात ६० मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या दमदार हजेरीने दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर, हाजी अली, वरळी परिसरातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अमृतांजन पुलाजवळ रात्रीच्या सुमारास एका ट्रकमधील पाइप पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर खंडाळा घाटात तीन वाहने बंद पडली होती. त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. अडथळा दूर करण्यात यश आले असून धीम्यागतीने वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.