विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील किनारी पट्टय़ात सुरू असलेली खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी संपूर्ण किनारी पट्टय़ाचे हेलिकॉप्टरने सर्वेक्षण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्य़ातील किनारी पट्टय़ात डेब्रिज माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून दररोज निघणारे शेकडो टन डेब्रिज किनाऱ्यांवर टाकून खारफुटी बुजविण्याचे उद्योग सुरू आहेत. वारंवार तक्रारी करूनही खारफुटीच्या कत्तलीकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ातील किनारी पट्टय़ाचे हेलिकॉप्टरने सर्वेक्षण करून खारफुटी संरक्षण आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी या बैठकीत दिली.
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंस मोठय़ा प्रमाणावर डेब्रिजच्या गाडय़ा रिकाम्या केल्या जात असून या संपूर्ण पट्टय़ात बेकायदा बेट उभारण्याचा उद्योग भूखंड माफियांना हाताशी धरून सुरू आहे. मुंबई तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर निघणाऱ्या डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी माफियांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे.
बांधकाम साइटवरून निघणारे डेब्रिज वाहून नेणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठमोठे विकासक लाखो रुपयांची कंत्राटे देतात. ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनाऱ्यांना या टोळ्यांनी बऱ्याच वर्षांपासून लक्ष्य केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्यावर भराव टाकायची आणि बेकायदा बांधकामे उभारण्याचे उद्योग काही महिन्यांपासून सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी यासंबंधीचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. खारफुटींची सर्रासपणे सुरू असलेली कत्तल माहिती असूनही जिल्हा प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्य़ातील सर्वच खाडीकिनाऱ्यांवर खारफुटींची कत्तल सुरू असून या सर्व परिसराची हेलिकॉप्टरने पाहणी करण्यात येईल, असे पालकमंत्री नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2013 रोजी प्रकाशित
खारफुटींची कत्तल रोखण्यासाठी खाडीकिनाऱ्यांची हेलिकॉप्टरने पाहणी
विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील किनारी पट्टय़ात सुरू असलेली खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी संपूर्ण किनारी पट्टय़ाचे हेलिकॉप्टरने सर्वेक्षण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
First published on: 01-06-2013 at 06:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help of helicopter watch to stop cutting of mangrove trees