कर्णबधिर मुलांसाठी मदतीचा हात हवा!

भांगे दाम्पत्याने शासनाच्या मदतीने कर्णबधिर मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ताटवाटी चाचणी’चा यशस्वी प्रयोग केला.

निवास सुविधेचा ‘बोलवाडी’चा संकल्प

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ‘व्हाइस ऑफ व्हाइसलेस अभियान’ या संस्थेचा ‘बोलवाडी प्रकल्प’ मुकेपणा निर्मूलनाच्या ध्येयाने कार्यरत आहे. या प्रकल्पातील कर्णबधिर मुलांच्या निवासासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळनजीक शेटफळसारख्या छोट्या गावात जयप्रदा आणि योगेश भांगे या सेवाव्रती दाम्पत्याने कर्णबधिर मुलांसाठी हा ‘बोलवाडी प्रकल्प’ सुरू केला आहे. तिथे ‘स्पीच थेरपी’द्वारे त्यांना बोलायला शिकवले जाते. सध्या १६० मूकबधिर मुले-मुली या प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. त्यातील बहुतांश मुले ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, गवंडी, सुतार, छोट्या व्यापाऱ्यांच्या कु टुंबातील आहेत. खर्चीक बाबी टाळून त्यांच्या पालकांद्वारेच त्यांना बोलायला शिकविणे ही ‘बोलवाडी’ची मुख्य संकल्पना आहे.

भांगे दाम्पत्याने शासनाच्या मदतीने कर्णबधिर मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ताटवाटी चाचणी’चा यशस्वी प्रयोग केला. त्याचे चांगले दृश्य परिणाम दिसून आले असून, कर्णबधिर मुलांच्या प्रश्नांना चालना मिळण्यास मदत झाली आहे. आता शहरी भागांतूनही या प्रकल्पात मुले येऊ लागली आहेत.  कर्णबधिर मुले व पालक ‘स्पीच थेरपी’चे धडे घेण्यासाठी शेटफळला बोलवाडीत येतात. त्यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था उभी करायची आहे. शेटफळला उतरल्यानंतर तेथून बोलवाडी प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी मुलांसह पालकांना पायपीट करावी लागते. ती टाळण्यासाठी प्रवासाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याचीही संस्थेची योजना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Helping hand for deaf children voice of voiceless campaign bolwadi project akp