नवीन वर्षांरंभी सरकारने केलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटीला महिन्याला २० कोटी रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळासमोर भाडेवाढीशिवाय पर्याय नसल्याचे संकेत महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात पुन्हा एकदा एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाने ऑगस्ट २०१२ मध्ये सव्वासहा टक्के आणि सप्टेंबर महिन्यात सहा टक्के अशी अगोदरच दोन वेळा भाडेवाढ केलेली आहे. त्यातच आता पुन्हा डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ करण्याची वेळ आल्यामुळे सहाजिकच त्याचा ताण प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे. त्यामुळे सहा महिन्यामध्ये तिसऱ्यांदा होणाऱ्या भाडेवाढीची नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल याचा अंदाज वरिष्ठ आधिकारी घेत आहेत.
हकीम समितीच्या शिफारशीनुसार अपोआप भाडेवाड सूत्रानुसार ती करावीच लागणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. आठवडय़ाभरात भाडेवाडीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडेही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महिन्याभरामध्ये भाडेवाढीचा शक्यता नाकारता येत नाही.