वाहन चालवण्याच्या बनावट लायसन्ससह (अनुज्ञप्ती)अन्य गैरप्रकारांना आळा बसावा आणि वाहनचालकाची वैयक्तिक माहितीही सुरक्षित राहावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार आधुनिक स्वरूपातील लायसन्स ऑक्टोबर २०१९ मध्ये आणले जाणार होते. परंतु या लायसन्ससाठीच्या सॉफ्टवेअरमधील काही तांत्रिक अडचणींमुळे नवीन वाहन लायसन्स मिळण्यास विलंब होणार आहे.

सध्याच्या लायसन्सवर चालकाचे एक मोठे छायाचित्र आणि त्याखाली लहान आकाराचे छायाचित्र असते. याशिवाय चालकाचे नाव, त्याचे वडील, पत्नी किंवा मुलगा, मुलगी यांपैकी एकाचे नाव, घरचा पत्ता, वाहन परवाना क्रमांक, परवाना मिळाल्याची तारीख, त्याची अंतिम मुदत इत्यादी माहिती असते. याशिवाय परवानाधारकाची माहिती असलेली एक चिपही असते. त्याच्या मागील बाजूस वाहन कोणत्या प्रकारातील आहे, याची वाहनांच्या वर्गीकरणासह थोडक्यात माहिती असते.

गेल्या काही वर्षांत बनावट लायसन्सची प्रकरणे समोर आल्यानंतर त्यांना आळा बसावा यासाठी लायसन्सच्या मांडणीतच बदल करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला. त्यानुसार आधुनिक स्वरूपातील लायसन्स वाहनचालकांना देण्यासाठी त्याची अंमलबजावणी देशभरासह महाराष्ट्रात ऑक्टोबर २०१९ पासून केली जाणार होती. मात्र त्याला आता आणखी विलंब होणार आहे. नवीन लायसन्ससाठी सॉफ्टवेअर बनवण्याचे काम केंद्र सरकारच्या नॅशनल इन्फरेमेटिक सेंटरकडे आहे. सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या आधुनिक लायसन्समध्ये सुरक्षिततेसाठी चिप आणि क्यूआर कोडची व्यवस्था देतानाच त्यात चालकाची माहिती साठवून ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले. यात चालकाचा आपत्कालीन संपर्क क्रमांकही असेल. याशिवाय लायसन्सच्या मागील बाजूस वाहनांच्या वर्गीकरणाची माहिती लघुस्वरूपात देतानाच त्याची अंतिम मुदतही असेल. या परवानाच्या रंगसंगतीतही बदल केले जातील.

ऑक्टोबर २०१९ पासून वाहनचालकांना नवीन स्वरूपातील लायसन्स मिळणार होते. परंतु या लायसन्ससाठी सॉफ्टवेअर बनवण्याचे काम हे केंद्राच्या नॅशनल इन्फरेमेटिक सेंटरकडे असून त्यावर अद्याप काम सुरू आहे. लवकरच नवीन लायसन्स चालकांना मिळेल.

– शेखर चन्ने, राज्य परिवहन आयुक्त