मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेतली जाणारी प्रतिष्ठेची ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’ येत्या २१ सप्टेंबरला (शनिवारी) होणार आहे. राज्यभरातून तब्बल ४३ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शनिवारी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही परीक्षा होईल.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन ती जोपासली जावी, त्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून ४० हजार विद्यार्थी बसले होते. यंदा यात आणखी तीन हजार विद्यार्थ्यांची भर पडली आहे. यंदाही राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.संघटनेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक, केंद्राचा पत्ता आणि प्रवेशपत्र यांची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यायचे आहे. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष प्रताप थोरात यांनी कळविले आहे.