यशाबरोबरच अपयशातूनही मला खूप शिकायला मिळाले. आयुष्यातील चूकांमधून मी खूप काही शिकलो, त्यामुळेच मी आज इथपर्यंत आलो आहे, अशी भावना हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या अभिनेता आमीर खान याने सोमवारी व्यक्त केली. चित्रपटसृष्टीतील आमीर खानच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 
ध्यास घेऊन काम करणे आणि जिद्दीपणा, या दोन गोष्टी मला माझी ताकद असल्याचे वाटते. त्याच्या जोरावरच मी इथवर प्रवास केलाय, या शब्दांत त्याने स्वतःचे परीक्षणही केले.
भारतीय सिनेमाचे शताब्दी वर्ष साजरे होत असतानाच, चित्रपट क्षेत्रातील माझ्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. २५ वर्षे पूर्ण झाली, यावर विश्वासच बसत नाही. आजही ‘कयामत से कयामत तक’चा चित्रीकरणाचे ते दिवस मला आठवतात. २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज मला माझ्या सर्व चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांचे आभार मानायचे आहेत. या सगळ्यांकडून मला शिकायला मिळाले. प्रेक्षकांचेही आभार मानण्याची ही वेळ आहे, असे मला वाटते. त्यांनी मला भऱभरून प्रेम दिले. जे कुठेही मोजता येणार नाही, असे आमीर खानने सांगितले.
मी कधीही पैशांसाठी, प्रसिद्धीसाठी, मोठ्या बॅनरसाठी काम केले नाही. जोपर्यंत मला चित्रपटाची कथा आवडत नाही. तो विषय माझ्या ह्रदयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मी तो चित्रपट स्वीकारत नाही. चित्रपट निवडताना मी त्याची कथा, त्याचा विषय याच्याशी कधीच तडजोड करत नाही, असेही आमीर खानने स्पष्ट केले.