मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल खात्यात तीन पाळ्यांमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नागरिकांना पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या चावीवाल्यांना निवडणुकीच्या कामास अनुपस्थित राहिल्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. हे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यानंतर नागरिकांना पाणी सोडण्याचे काम कोण करणार असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, चावीवाल्यांची निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती रद्द करावी असे विनंतीपत्र महापालिकेने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले होते, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सात धरणांतील पाणी मुख्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिन्यांच्या जाळ्यातून मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना पुरविले जाते. शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले पाणी तीन पाळ्यांमध्ये मुंबईतील विविध विभागांना पुरविले जाते. या कामात चावीवाल्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जलखात्याच्या विशिष्ट चावीने पाणीपुरवठा सुरू आणि बंद करण्यात येतो. त्यासाठी चावीचे ठरावीक फेरी फरवावे लागतात. त्यात चूक झाल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. या विशिष्ट कामासाठी चावीवाल्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य कर्मचाऱ्यांना या कामाचा अनुभव नाही. त्यांनी ते काम केल्यास चूक होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : मुंबई : नाश्ता बनावला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

चावीवाल्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जल खात्यातील संपूर्ण मुंबईमधील चावीवाल्यांची लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र चावीवाल्यांअभावी पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन या संदर्भात दै. ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी चावीवाल्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त केले. परंतु पूर्व आणि पश्चिम उपनगर जिल्ह्यांतील निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त चावीवाल्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या नाहीत. या संदर्भात महानगरपालिकेने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलटपक्षी आता पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील चावीवाल्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांमध्ये नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर व्हावे, अनुपस्थित राहिल्याबद्दल लेखी खुलासा करावा, अन्यथा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साडेपाच हजारांहून अधिक वाहन खरेदी

चावीवाले कात्रीत

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील एकामागून एक अशा अनेक चावीवाल्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा येवू लागल्यामुळे जल खात्याचे धाबे दणाणले आहे. भल्या पहाटेपासून मध्यरात्रीनंतर अखंडपणे तीन पाळ्यांमध्ये विविध विभागात पाणी सोडणारे चावीवाले निवडणुकीच्या कामासाठी निघून गेले तर पाणीपुरवठा कसा करायचा असा प्रश्न जल खात्याला सतावू लागला आहे. कारवाईच्या भितीमुळे चावीवाले भेदरले आहेत. निवडणुकीच्या कामास गेलो नाही तर निवडणूक आयोगाकडून करवाई होईल आणि गेलो तर नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल अशा संभ्रमावस्थेत चावीवाले आहेत.