मुंबई : भारतातील वाढत्या लग्न समारंभांचे मलेशियातील पर्यटन व्यवसायाला आकर्षण असून मलेशियाने त्या दृष्टीने पर्यटन विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही बाब लक्षात घेत मलेशियाच्या पर्यटन विभागाने करोनाकाळानंतर देसारू आणि लांगकावी ही ठिकाणे भारतीयांसाठी खुली केली आहेत.
भारतीय विमानसेवा आणि हॉटेलसेवा यांच्या सहकार्याने मलेशियात भारतीयांसाठी लग्न समारंभासाठी उपलब्ध करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रचार प्रसार विभागाचे (आशिया आणि आफ्रिका) वरिष्ठ संचालक मनोहरन पेरियासमी यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय पर्यटकांकडून मलेशियाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. मलेशियातील पर्यटन व्यावसायिकांना भारतातील लग्न परंपरांचे आकर्षण असून करोनाकाळानंतर मलेशियातील लग्न समारंभासाठी काही ठिकाणे खुली केली आहेत. त्याचबरोबर विवाहसोहळय़ांसाठी सिंगापूरजवळ असलेले ‘देसारू’ हे ठिकाण खुले करण्यात आले आहे. त्याचबरोबर क्वालालम्पूर येथील काही नवीन ठिकाणेही खुली झाल्याचे मनोहरन पेरियासमी यांनी सांगितले. लग्न समारंभात भारतीय संगीत, मेहेंदीच्या कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यासाठी मलेशियातही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
मलेशिया सरकारने मलेशियातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील पर्यटक मलेशियात भटकंतीसाठी यावेत यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मध्य पूर्वेकडील देशांवर मलेशियाचे प्रामुख्याने लक्ष्य केंद्रित केले आहे, अशी माहिती मनोहरन पेरियासमी यांनी दिली. मलेशियाला २०१९ मध्ये ७,३५,३०९ भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती, असेही त्यांनी नमूद केले.