प्राप्तिकर विभागाला भाडय़ाने मोटारगाडय़ा देण्याचा व्यवसाय करणाऱ्या इसमाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी मुंबई प्राप्तिकर विभागात क्षेत्रीय लेखा कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लेखा अधिकाऱ्यासह एकाला रंगेहाथ पकडले. लक्ष्मीकांत दुधे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्राप्तिकर विभागाला भाडय़ाने मोटारगाडय़ा देणाऱ्या व्यक्तीने प्रलंबित बिले मंजुर करून पैसे मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतली. बिले मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच देण्याची मागणी आरोपीने केली. त्यानंतर या व्यक्तीने याबाबत केंद्रीय गुप्तचर विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे केंद्रीय गुप्तचर विभागाने सापळा रचला आणि दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लक्ष्मीकांत दुधे आणि त्यांच्यासह लाच स्वीकारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीस रंगेहाथ पकडण्यात आले.
 आयकर भवन या प्राप्तिकर विभागाच्या मरीन लाईन्स येथील कार्यालयातच क्षेत्रीय लेखा कार्यालय असून त्या कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवारी वरिष्ठ लेखा अधिकारी लक्ष्मीकांत दुधेसह आणखी एका व्यक्तीस विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.