सनदी अधिकाऱ्यामार्फत चौकशी- विजय वडेट्टीवार

मुंबई : पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत (सारथी)  अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.  या संस्थेमध्ये आता सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत सखोल चौकशी करण्याची घोषणा विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केली.

बार्टीच्या धर्तीवर इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती (व्हीजेएनटी)साठी  ‘महाज्योती’ ही नवीन संस्था नागपूरमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

‘सारथी’मध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सारथीमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार निंबाळकर यांनी प्राथमिक चौकशी अहवाल सरकारला सादर केला असून त्यात  सारथीमध्ये संस्थेच्या संचालकांनी मोठय़ा प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सारथीमध्ये आता सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याच्या मार्फत पुढील चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

चौकशी अहवालानुसार संस्थेचे संचालक परिहार यांनी गरज नसताना मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची खरेदी केली असून मानधनावर कर्मचाऱ्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी दिलेला राजीनामा सरकारकडे न पाठविता स्वत:जवळ ठेवून दिला. ३८१ कामगार कोणतेही काम नसतानाही वेतन घेत होते. कार्यालय दुरुस्तीवर एक कोटी खर्च करण्यात आले तर ५४ लाखांची पुस्तके खरेदी करण्यात आली. यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लास घेणाऱ्या २२६ मुलांसाठी आठ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले असून त्यात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सखोल चौकशीचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.