पोलीस असल्याचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी चर्नी रोड येथे गुरुवारी सायंकाळी ग्राहकाला सोन्याचे दागिने पोहोचविण्यासाठी जात असलेल्या एका व्यक्तीकडील १२ लाख रुपये किमतीचे दागिने लुटून नेले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सांताक्रुझ येथील ‘सॉलिटेअर ज्वेलर्स’ पेढीमध्ये काशिनाथ सरदार हा गेली पाच वर्षे नोकरी करीत आहे. गुरुवारी सायंकाळी एका ग्राहकाला सोन्याचे दागिने देण्यासाठी तो ऑपेरा हाऊस येथे आला होता. परंतु ग्राहकाने काही कारणास्तव दागिने घेण्यास नकार दिल्याने ते घेऊन तो पुन्हा सांताक्रुझला जात होता. तो चर्नी रोड स्थानकाजवळ पोहोचताच पोलिसांच्या वेशातील दोघांनी त्याला अडवले. रस्त्यावर थुंकल्याबद्दल दंड ठोठावण्याची धमकी त्या दोघांनी काशिनाथला दिली. आपण थुंकलो नसल्याचे तो त्यांना वांरवार सांगत होता. पोलिसांच्या वेशातील आरोपींनी काशिनाथला बॅग दाखविण्यास सांगितले. पोलीस असल्याने काशिनाथनेही भीतीपोटी त्यांना आपल्याकडील बॅग दाखवली. त्यात सोन्याचे दागिने असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी काशिनाथकडील बॅग खेचून तेथून पळ काढला. सायंकाळची वेळ असल्यामुळे या परिसरात प्रचंड वर्दळ होती. या गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी तेथून पळ काढला. या दोन लुटारूंचे वर्णन काशिनाथने पोलिसांना सांगितले असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.