ठाण्याच्या ‘के. सी. अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’च्या अंतिम वर्षांच्या २३ विद्यार्थ्यांनी एका विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून महाविद्यालयाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पत्र लिहून संबंधित गोंधळाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्सच्या आठव्या सत्राचा निकाल परीक्षा विभागाने २२ जुलैला जाहीर केला. त्या वेळी ‘अॅडव्हान्स व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेशन डिझाईन’ या विषयामध्ये महाविद्यालयाचे २३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. या विषयात कुणाला दोन, कुणाला नऊ असे गुण मिळाले आहेत. ६०-७० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थीही केवळ या विषयात कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण असे होतात, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. म्हणून त्यांनी महाविद्यालयाकडे विभाग प्रमुखांमार्फत तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने महाविद्यालयाने विद्यापीठाला पत्र लिहिले. या बाबत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांना विचारले असता त्यांनी मात्र महाविद्यालयाकडून अद्याप तक्रार आली नसल्याचे सांगितले.
दोन वर्षांपूर्वी साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांबाबतही असाच गोंधळ झाला होता. त्यावेळी परीक्षा विभागाने महाविद्यालयामार्फत आलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपासणीअंती या विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले होते.