लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी घडली. गेल्या दोन दिवसांतील अशा स्वरूपाची दुसरी घटना आहे. त्यावर सोमवारी घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी लोकल पाडून अभ्यास करण्याचा प्रयोग केला असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले. मात्र, अशा प्रयोगाची किंवा त्यामुळे वाहतूकीवर होणाऱ्या परिणामांची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी हार्बर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीच्या फलाट क्रमांक दोन वर लोकल येत असताना ती सोमवारी रूळावरून घसरली. त्यानंतर सुमारे तीन तासांनी हार्बर मार्ग सुरू करण्यात आला. त्यावेळी प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी, बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास त्याच ठिकाणाजवळ लोकल रेल्वे रूळावरून घसरली. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते कुर्ल्यापर्यंत आणि मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याणपर्यंत रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता. अचानक सायंकाळच्या गाड्या थांबवण्यात आल्या. अनेक गाड्या किमान अर्धातास जागच्या जागी खोळंबल्या. मुळातच सुट्टीमुळे कमी लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यातच लोकलची वाहतूक खोळंबल्ट्नंतर दादर, कुर्ला, ठाणे, वडाळा स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेनंतर १४ लोकल रद्द झाल्याने हजारो प्रवाशांचा प्रवास रखडला.

आणखी वाचा-मुंबई आणि परिसरातील तापमानात घट, आर्द्रतेमुळे उष्मा कायम

सार्वजनिक सुट्टी असल्याने, शासकीय कार्यालये बंद असल्याने बुधवारी लोकलमध्ये तुलनेने गर्दी कमी होती. मात्र खासगी कर्मचारी कामावर जाऊन परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात आले होते. सुट्ट्यांच्या औचित्याने फिरण्यासाठी, परगावी जाण्याच्या गाड्या पकडण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच रेल्वे रूळ, स्लीपर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुख्य मार्गावरही परिणाम

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबल्यानंतर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे सीएसएमटीवरून साधारणपणे मुख्य मार्गावरील धीम्या गाड्या सोडल्या जातात, त्या फलाट क्रमांक ३ वरून हार्बर मार्गावरील गाड्या चालवण्यात आल्या. त्यामुळे मुख्य मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवरही काहिसा परिणाम झाला. रुळावरून घसरलेला डबा सायंकाळी ६.२५ रूळावर आणण्यात आला. त्यानंतरही रात्री उशीरापर्यंत वाहतूक खोळंबलेली होती.

आणखी वाचा-पैसे जमा करा अथवा चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ; उच्च न्यायालयाचे पश्चिम रेल्वेला आदेश

…सर्व फक्त अभ्यासासाठी

बुधवारी दुपारी ४.१३ वाजता सीएसएमटी येथे फलाट क्रमांक २ च्या आधी लोकल रेल्वे रूळावर घसरली. त्यानंतर संबंधित ठिकाणी लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. सोमवारी लोकल घसरली तेथे ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. तेव्हा ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

सीएसएमटी येथे २९ एप्रिल रोजी लोकल घसरली होती. ती कशी आणि का घसरली त्याचा गेल्या दोन दिवसांपासून अभ्यास सुरू आहे. बुधवारी झालेली दुर्घटना ही त्यातलाच भाग होता. लोकलची चाचणी घेत असताना, ती रूळावरून घसरली. अभ्यासासाठी हे आभासी चित्र निर्माण करण्यात आले, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई : चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू

वेगमर्यादा जैसे-थे

सोमवारी सीएसएमटी येथे लोकल घसरण्याची घटना घडल्याने, त्याठिकाणी वेगमर्यादा ताशी ३० किमीवरून ताशी १५ ते २० किमी करणे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असताना, मध्य रेल्वेने ताशी ३० किमीच वेगमर्यादा ठेवली. तसेच सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ यांची देखभाल-दुरूस्ती योग्यप्रकारे होत नसल्याने, प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

लोकल घसरण्याच्या, तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर गेल्या तीन महिन्यात धावत्या लोकलमधून पडून ९२ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन ढिम्म असल्याचे दिसते. रेल्वे प्रशासन हे प्रवासी, प्रवासी संघटना यांचे मत जाणून न घेता मनमानी कारभार करत आहेत. तसेच आता तीन दिवसांत दोन वेळा लोकल घसरल्याची घटना घडल्याने वित्तहानी मोठ्याप्रमाणात झाली आहे. -मधू कटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ