मुसळधार पावसात कोसळलेल्या माहीम येथील ‘आल्ताफ मेन्शन’प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेतील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अन्य दोघांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुसळधार पावसात निम्मी ‘अल्ताफ मेन्शन’ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. त्यानंतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून उर्वरित इमारतही तोडण्यात आली. याप्रकरणी अॅड. रिझवान र्मचट यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. या संदर्भात चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. अॅड. र्मचट यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यामुळे इमारत आणि कारखाने विभागातील साहाय्यक अभियंता चंद्रकांत शेंडे, उपअभियंता दिगंबर साटम आणि कनिष्ठ अभियंता प्रवीण राणे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. तसेच पालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त नारायण पै आणि कार्यकारी अभियंता चिरोटे यांची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.