दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरातील  इमारतीला शनिवारी दुपारच्या सुमारास लागलेली भीषण आग अद्यापही विझलेली नाही. या आगीची तीव्रता खूपच जास्त असून आग विझविण्यासाठी इमारतीत शिरलेला अग्निशमन दलाचा सुनिल नेत्रेकर हा अधिकारी गंभीररित्या भाजला आहे.  तसेच तीन नागरिकही जखमी झाले आहेत.
येथील जुन्या हनुमान गल्लीतील गोकुळ निवास नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागातील ३३ क्रमांकाच्या इमारतीमध्ये ही आग लागली आहे. एकूण चार मजल्यांच्या या इमारतीतील तीन मजले रहिवासी आणि एक मजला व्यापारी कारणासाठी वापरला जात होता. इमारतीमध्ये असलेल्या कापडांच्या गोदामामुळे आग मोठ्याप्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे.  
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ८ पाण्याचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर  ही आग विझविण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि अरूंद जागा यामुळे अग्निशमन दलाला इमारतीपर्यंत नीटपणे पोहचण्यात अडथळा येत आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूच्या इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी तीनजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.