दादर पश्चिमेकडील पाटीलवाडी ही झोपडपट्टी म्हणून घोषित करावी व झोपु योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी २००६ पासून तेथील रहिवासी माझ्याकडे करीत होते. परंतु पालिका प्रशासन दखल घेत नव्हते. त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व योग्य ती कारवाई व्हावी यासाठी २००८ मध्ये पत्र दिले. माझ्या पत्रानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पालिकेने सदरचा भूभाग झोपडपट्टी म्हणून घोषित केला. त्यामुळे माझ्या प्रतापामुळे चाळीची झोपडपट्टी झाली हा मथळा दिशाभूल व माझी बदनामी करणारा आहे, असा खुलासा माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे. ‘मनोहर जोशी यांचा प्रताप – जावयासाठी चाळीची झोपडपट्टी केली!’ या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात जोशी यांनी हा खुलासा केला आहे.