मुंबई महापालिकेचे सर्व कामकाज मराठीतून करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पालिकेतील सर्व अमराठी नगरसेवकांना मराठीचे प्रशिक्षण देण्यासाठी २००९ मध्ये एक ठराव संमत करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेने गेल्या तीन वर्षांत निधीची तरतूदच न केल्यामुळे अमराठी नगरसेवकांचा मराठीचा हा प्रस्तावित वर्ग प्रत्यक्षात भरलाच नाही.
महापालिकेत सध्या ‘मराठी पंधरवडा’ साजरा केला जात आहे. परंतु सर्वत्र १०० टक्के मराठीतून कामकाज करण्याचा निर्णय झाला असताना अमराठी नगरसवेकांच्या मराठीच्या प्रशिक्षणाचे काय झाले, असा मुद्दा मनसेचे दिलीप लांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उपस्थित केला. भाजपच्या नगरसेवकांनीही या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. अतिरिक्त आयुक्त मोहन आडतानी यांनी तांत्रिक आडचणीमुळे १०० टक्के मराठीतून कामकाज करणे शक्य नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.