जुहू समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला असून नैराश्याला कंटाळून एमबीएच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तरुणाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यात त्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अजित दत्तात्रय डुकरे (२९) असे आहे.

जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयटी कंपनीत कामाला असणारा अजित हा घाटकोपरच्या इंदिरानगरमध्ये आई, वडील आणि भावंडांसोबत राहात होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेला अजित नेहमीच आपल्या विश्वात गुंग होता. त्यामुळे आई, वडील, मित्रांसोबतही त्याचा संवाद होत नसे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अजित बेपत्ता झाला होता आणि याबाबतची तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्याचा मृतदेह जुहू चौपाटीवर सापडला. अजितजवळ लोकलचा पास असल्याने त्यावरून त्याची ओळख पटविण्यात आली.

‘एका पुस्तकी किडय़ाचा अंत’

डुकरे याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत आई, वडील, भावांची माफी मागतानाच आपण गर्विष्ठपणे वागलो. त्यामुळे माफी मागण्याच्या मी लायक नाही. आयुष्य जगण्याची कला शिकलो नसल्याची खंत व्यक्त करतानाच मी जलसमाधी घेत असल्याचे त्याने म्हटले. तसेच शेवटी ‘एका पुस्तकी किडय़ाचा अंत’ असेही लिहिले आहे.