स्तनाच्या कर्करोगाचे निदान वेळेत करण्यासाठी वैद्यकीय स्तन परीक्षण (सीबीई) चाचणी प्रभावशाली असल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संशोधन अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. सध्या सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या ‘मॅमोग्राफी’पेक्षा सीबीई ही तुलनेने कमी खर्चीक आणि सहज होणारी चाचणी आहे.

मुंबईत १९९२ ते २०१६ या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहे. देशातही हे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. कर्करोगाने मृत्यू होणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सध्या मॅमोग्राफी चाचणी केली जाते. परंतु ही चाचणी करण्यासाठी महागडी यंत्रसामुग्री, उच्च प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट, रेडिओग्राफर आणि गुणवत्ता नियंत्रण गरजेचे आहे. डिजिटल मेमोग्राफी यंत्राची किंमत साधारण तीन कोटी रुपये असून परीक्षणासाठी सुमारे दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मोठय़ा पातळीवर मेमोग्राफीद्वारे चाचणी करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर स्तनाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान होण्यासाठी आणि संभाव्य मृत्यू रोखण्यासाठी वैद्यकीय स्तन परीक्षण चाचणीच्या उपयुक्ततेचा अभ्यास टाटा मेमोरियल रुग्णालयात २० वर्षांपूर्वी डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला होता.  याबाबतचा अहवाल ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यानुसार सीबीई करणाऱ्या ५० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात ३० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?

१९९८ मध्ये यादृच्छिक (रॅण्डम) पद्धतीने सुरू केलेल्या या अभ्यासात मुंबईतील २० विभागांमधील ३५ ते ६४ वयोगटातील १ लाख ५१ हजार ५३८ महिलांना समाविष्ट केले होते. पहिल्या गटात ७५ हजार ३६० महिलांची सीबीई प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने चार वेळा अशी प्रशिक्षित महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. त्याचप्रमाणे कर्करोगाविषयी जनजागृतीही करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांच्या अंतराने पाच वेळा महिलांच्या घरी भेट देऊन पाठपुरावा करण्यात आला. दुसऱ्या गटात ७६ हजार १७८ महिलांच्या समूहामध्ये पहिल्यांदा कर्करोगाविषयी जनजागृती करून नंतर आठ फेऱ्यांमध्ये घरी भेट देऊन पाठपुरावा करण्यात आला. दोन्ही गटांतील महिलांना टाटा मेमोरियल रुग्णालयात विनामूल्य निदान आणि उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. या अभ्यासात पाठपुरावा करून नोंदणी ठेवणे, दोन दशकांहून अधिक काळ तपासण्या आणि महिलांचे समुपदेशन करणे हे फार अवघड होते. परंतु यातून आलेल्या निष्कर्षांमुळे भारतासह विकसनशील देशांमध्ये सीबीई चाचणी कर्करोगावर नियंत्रणास फायदेशीर असल्याचे मोठे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. मिश्रा यांनी व्यक्त केली. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असे मत या अभ्यासाचे सहलेखक आणि संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केले.

सीबीई चाचणीचे महत्त्व

शारीरिक अस्वस्थता, प्रक्रियेची भीती आणि निदानास विलंब या कारणांमुळे सुमारे १५ ते ३५ टक्के महिला मेमोग्राफी करण्यास तयार होत नाहीत. मेमोग्राफीच्या तुलनेत सीबीई कमी खर्चाची, तांत्रिकदृष्टय़ा योग्य, महिलांसाठी अनुकूल, स्पर्श संवेदनशील आणि सहजपणे करण्यात येणारी चाचणी आहे. तसेच वेदनेमुळे येणारी अस्वस्थता आणि रेडिएशनचा धोकाही यात उद्भवत नाही.

निष्कर्ष काय?

सीबीई केलेल्या गटात अन्य गटांच्या तुलनेत स्तन कर्करोगाचे निदान लवकर झाले. त्यामुळे अधिक प्रगत अवस्थेतील कर्करोगाच्या प्रमाणात ३७ ते ४७ टक्के घट झाली. त्याचप्रमाणे कर्करोगाच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाल्याचे आढळले. ५०हून जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू ३० टक्क्यांनी घटले. या अभ्यासानुसार, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना जास्त फायदा झाला नसला तरी या चारही फेऱ्यांमध्ये नियमित तपासणी केलेल्या महिलांच्या मृत्युदरात ३४ टक्के घट आढळली.