मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठीच्या १७ भूखंडाच्या ई – लिलावासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या भूखंडांसाठी निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठीचे पत्र मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. एक-दोन दिवसात या बाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये १७३ दुकानांचा ई – लिलाव जाहीर करून यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईतील १७ भूखंड मार्चमध्ये विक्रीसाठी काढले आहेत. मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा त्यात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाचे हे भूखंड असून या भूखंडासाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. या भूखंडांसाठी प्रति चौरस मीटर ४५ हजार ३०० रुपयांपासून १ लाख ६ हजार १७० रुपयांपर्यंत दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीहून अधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई – लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे.

हेही वाचा…मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध

मुंबई मंडळाला या भूखंडांच्या विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई – लिलावासाठी १३ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा सादर करण्याची अंतिम मुंदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. असे असताना निविदा दाखल करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ई – लिलावास प्रतिसाद वाढवा यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. पण त्याचवेळी आचारसंहिता काळात ई – लिलावाची प्रक्रिया पार पाडणे शक्य नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा विचार आहे. यासंबंधीच्या पत्रास मुख्य अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यास मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये भूखंडांचा ई – लिलाव होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada going to extends deadline for e auction of 17 plots in mumbai mumbai print news psg
Show comments