मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८९८४ घरांसाठी गुरुवारी ऑनलाइन सोडत निघणार असून दोन लाख ४६ हजार अर्ज आले आहेत. सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ होणार असून या वेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. http://mhada.ucast.in या संके तस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार १०० जणांना सभागृहात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली. सकाळी १० वाजल्यापासून सोडतीला सुरुवात होणार असून एकेका संकेत क्रमांकानुसार ऑनलाइन सोडत काढली जाईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.