मुंबईच्या मुलुंड वेस्टमध्ये एका सोसायटीमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तृप्ती देवरुखकर असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सोसायटीत जाऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी तृप्ती देवरुखकर यांची माफी मागितली. मात्र, आता या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

मुलुंड वेस्टमधील शिवसदन सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी तृप्ती देवरुखकर यांना सोसायटीत घर देण्यास नकार दिला. “महाराष्ट्रीयन अलाऊड नाही, आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना घर देत नाही”, अशा शब्दांत त्यांनी तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तृप्ती देवरुखकर यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर हे प्रकरण वाढलं.

या प्रकरणाची मनसेनं दखल घेत सोसायटीत जाऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी तृप्ती देवरुखकर यांची माफीही मागितली. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाला लक्ष्य करत मुंबईतील मराठी माणसांवर अन्याय होत असल्याची टीका केली.

“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

याबाबत सत्ताधाऱ्यांनी तातडीने कारवाई करायला हवी, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात माहिती घेऊन योग्य ती पावलं उचलली जातील, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.

मनसेचं ट्वीट, आदित्य ठाकरे लक्ष्य

दरम्यान, या मुद्द्यावरून मनसेनं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आदित्य ठाकरेंनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवताना वरळीत वेगवेगळ्या भाषेत ‘कशी आहे वरळी?’ असा प्रश्न विचारणारे बॅनर्स लावले होते. त्यात ‘केम छो वरली?’ असाही बॅनर होता. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

“केम छो वरळी? होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिंमत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हणतात. यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही”, असं संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns targets aaditya thackeray on marathi women declined house in mumbai pmw