पाणी म्हणजे जीवन! त्यासाठी काहीही करायची लोकांची तयारी असते. गुरुवारी तर मध्य रेल्वेच्या गार्ड आणि मोटारमननी केवळ पाण्यासाठी वाहतूक अडवून धरली. त्याचा मात्र नाहक त्रास प्रवाशांना झाला. मोटरमन आणि गार्ड यांच्यासाठी सीएसटी स्थानकावर असलेल्या कक्षातील पाणीपुरवठा बुधवारी सकाळी खंडित झाला होता. हा पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय गाडीवर न जाण्याची आडमुठी भूमिका काही गार्ड आणि मोटरमननी घेतल्याने सकाळच्या वेळेतील तब्बल दीडशे सेवांना त्याचा फटका बसला.
मध्य रेल्वेमार्गावरील गाडय़ा खूप क्वचितच वेळेवर धावतात. मात्र त्यामागे काही ‘तांत्रिक बिघाड’ कारणीभूत असल्याचे रेल्वेतर्फे नेहमीच सांगितले जाते. बुधवारची सकाळही या दिरंगाईला अपवाद नव्हती. मात्र या वेळी मध्य रेल्वेतर्फे कोणतीही उद्घोषणा झाली नाही. याच्या खोलात गेले असता या दिरंगाईमागे कोणताही तांत्रिक बिघाड नसून पाणीप्रश्न असल्याचे लक्षात आले.
गार्ड आणि मोटरमन यांची ही आडमुठी भूमिका सकाळी सव्वाआठ ते पावणेनऊ या वेळेत कायम राहिल्याने या अध्र्या तासात सीएसटीहून सुटणाऱ्या गाडय़ा स्थानकातच उभ्या राहिल्या. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. त्याचा त्रास प्रवाशांना झाला. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना विचारले असता, या प्रकरणात नेमके काय आणि कसे घडले, याची चौकशी रेल्वे प्रशासन करणार आहे.  याबाबत योग्य ती उपाययोजना रेल्वे प्रशासन करेल, असे त्यांनी सांगितले.