आठवडय़ाची मुलाखत : हृषीकेश यादव

कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष, युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

डोंगरदऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये भटकताना हरवणे, अपघात होणे अशा बातम्या हल्ली वारंवार वाचायला मिळतात. त्यावर मग अशा प्रकारांना कठोर नियम हवेत वगैरे चर्चादेखील सुरू होतात. हे प्रकारच बंद करा, असा सूरदेखील उमटतो. आता हिवाळ्यातील ट्रेकिंगचा मोसम आणि सुट्टीतील शिबिरांची लगबग सुरू होईल. त्या निमित्ताने ज्येष्ठ गिर्यारोहक हृषीकेश यादव यांच्याशी साधलेला संवाद.

* डोंगरभटकंती व इतर साहसी प्रकारांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामागे काय कारण आहे?

यासाठी आधी आपल्याकडील साहसी क्रीडा प्रकारांची व्याप्ती समजून घ्यावी लागेल. आपल्याकडे साहसी क्रीडा प्रकार मुख्यत: गिर्यारोहणाचा विकास झाला तो संस्थात्मक रचनेत. संस्थेत आलेला अनुनभवी नवखा, कालांतराने जाणता वरिष्ठ होतो आणि मग तो पुन्हा नवख्यांना तयार करतो. त्यातून एका संस्थेची वाढ होते. त्या अनुषंगानेच मग सुरक्षा व इतर साधनसामग्री विकसित होत जाते. सुरक्षेचे धडे हा त्या रचनेचा भाग असतो. या रचनेत अपघात झालेच नाहीत असे म्हणता येणार नाही, पण त्याला संस्थेचा आधार होता. इथे एक लक्षात घ्यावे लागेल की यामध्ये धोका आहे म्हणून त्यात साहस आहे आणि म्हणूनच त्याला साहसी क्रीडा प्रकार म्हणतात. हे धोके कमी करण्यासाठी म्हणून जी खबरदारी घ्यायची असते ती म्हणजे ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ अर्थात मोजूनमापून घेतलेली जोखीम. ही जोखीम अनुभवातूनच घेता येते. केवळ पुस्तकातून समजून हे करता येत नाही. संस्थात्मक वाढीमध्ये अशा अनुभवांची कमतरता नसते आणि तेथे एक क्रीडा प्रकार म्हणूनच याकडे पाहिले गेले आणि त्याचा विकास झाला. आज संस्थात्मक वाढ कमी झाली आहे, तर दुसरीकडे साहसी पर्यटन हा प्रकार वाढतोय. साहसी पर्यटनामध्ये केवळ क्षणिक आनंद म्हणून येणाऱ्यांचा सहभाग अधिक असतो. अशा वेळी त्या सहभागींना कॅलक्युलेटेड रिस्कचा भाग समजेलच असे नाही. किंबहुना त्यांना खेळाच्या प्रशिक्षणाशी काही संबंध नसतो. उदाहरणच द्यायचे तर, रॅपलिंगला जाऊन आलेले असंख्य असतात, पण त्याचं तंत्र किती जणांना उमजते? त्यामध्ये केवळ त्या प्रशिक्षकापुरताच तो भाग मर्यादित राहतो. मात्र संस्थेमध्ये येणारा ट्रेकर वा गिर्यारोहक हा ते शिकण्यासाठी येत असतो. त्यातून तो विकसित होत जातो. संस्थात्मक वाढ कमी होत जाणं हा सध्याचा सर्वात मोठा धोका आहे. संस्थात्मक वाढ सुरळीत झाली तर अनेक बाबी सोप्या होतील.

* पण कधी कधी चार-पाच जणांच्या गटामध्येदेखील अशा घटना घडतात.

असे काही अपवादात्मक छोटे गट हे चांगल्या ट्रेकर्सचे असतात. तिथे प्रत्येकाला एकमेकाबद्दल खात्री असते. पण जेव्हा तुम्ही सर्वच जण नवखे असता, एकमेकांच्या क्षमता माहीत नसतात, केवळ त्या एका ट्रेकपुरता एकत्र आलेला गट असे स्वरूप असते तेव्हा समन्वयाचे प्रश्न निर्माण होतात. तुलनेने संस्थांमध्ये असे प्रकार कमी होताना दिसतात.

* मग सर्वानाच प्रशिक्षण अनिवार्य असायला हवे का?

प्रशिक्षण हे गरजेचे आहेच, पण केवळ प्रशिक्षण घेतले म्हणून भागणार नाही, तर त्याचा नियमित सराव असायला हवा. पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रशिक्षण घेतलंय, पण शिबिरातच काय स्वत:देखील काही सराव केलेला नाही आणि ती व्यक्ती अचानक एखाद्या मोहिमेत अथवा शिबिरात शिकवायला जात असेल तर त्यात काही हशील नाही. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय प्रशिक्षण संस्था उत्तर भारतात आहेत. हिमालयीन मोहिमांमध्ये त्या प्रशिक्षणाचा फायदा होतोच. पण सहय़ाद्रीत भटकताना प्रशिक्षण हवे का, असा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. तर असे प्रशिक्षण आपल्याच स्थानिक गिर्यारोहण संस्थेच्या अंतर्गत देण्याची रचना विकसित होऊ  शकते. काही प्रमाणात महाराष्ट्रातील संस्थादेखील साहस शिबिरं व प्रस्तरारोहण शिबिरांच्या माध्यमातून असे प्रशिक्षण वर्ग अनेक वर्ष चालवतात. ब्रिटिश माऊंटेनीअरिंग कौन्सिल या इंग्लंडमधील देश पातळीवरील संघटनेने इंग्लंडमधील प्रत्येक गिर्यारोहण संस्थेने स्थानिक पातळीवरच आपल्या सभासदांना ट्रेकिंगचे प्रशिक्षण द्यावे, अशी रचना तयार केली आहे. आपणदेखील त्यानुसार संस्थाअंतर्गत प्रशिक्षण सहय़ाद्रीतील भटकंतीसाठी देऊ  शकतो.

आज संस्थांबरोबरच अनेक जण व्यापारी पद्धतीने शिबिरांचे आयोजन करीत असतात. त्यासाठी संस्थांपेक्षा चार पैसे अधिक मोजावे लागतात, त्यालादेखील हरकत नाही. मात्र तसे केल्यास चांगले प्रशिक्षित व सराव करणारे प्रशिक्षक नेमणे ही त्या आयोजकाची जबाबदारी असेल. पण नफा वाढवण्यासाठी कमी पैशात प्रशिक्षक नेमले जात असतील ते योग्य ठरणार नाही. केवळ व्यापारी वृत्ती ठेवून गुणवत्तेला तडा जाता कामा नये.

* या सर्वानाच नियमात बांधण्याची गरज आहे का?

जसे इतर सर्व क्रीडा प्रकारांचे नियम हे त्या त्या क्रीडेच्या संघटना ठरवतात तशी रचना असायला हरकत नाही. पण आपल्याकडे ही रचना सक्षम नाही. मुळात आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश पहिल्यांदा क्रीडा धोरणात केला तो २०१२ मध्ये. तोपर्यंत शासन याकडे विशेष बाब म्हणूनच पाहत होते. महाराष्ट्रात साहसी क्रीडा प्रकार मुख्यत: गिर्यारोहणाला ६० वर्षांचा इतिहास आहे. हवेतील व पाण्यातील साहसी क्रीडा प्रकार तुलनेने अलीकडच्या काळातले आहेत. गिर्यारोहणाची संस्थात्मक रचना आहे, पण इतर प्रकार केवळ अगदीच मर्यादित भौगोलिक क्षेत्रातच विकसित झाले आहेत. आपण आंतरराष्ट्रीय रचनेचा आधार घेऊन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. पण एकूणच याबाबत शासकीय स्तरावर असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे हे काम विलंबाने होत आहे. साहसी पर्यटनाचा पाया हादेखील साहसी खेळच आहे. त्यामुळे त्यांनादेखील खेळाचीच चौकट ठेवावी लागेल. मात्र कोणत्याही साहसी खेळाला चौकटीत बांधता येत नाही. चार भिंतींबाहेर नैसर्गिक रचनांचा वापर करून खेळला जाणारा हा क्रीडा प्रकार आहे. त्याला मार्गदर्शक तत्त्वे असू शकतात. कारण धोका कमी करण्यासाठी कॅलक्युलेटेड रिस्क घेताना काय करायचे याचे ज्ञान हे प्रशिक्षणातून आणि अनुभवातूनच येते, नियमांमधून नाही.