उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

अवाच्या सवा भाडे, गाडय़ांची गैरसोयीची वेळ यामुळे वातानुकूलित लोकल गाडीला सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी आता उन्हाच्या तडाख्याबरोबर तो वाढतो आहे. वातानुकूलित लोकलच्या तीन फेऱ्या सध्या हाऊसफुल्ल जात आहेत. बोरिवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकातून या गाडीला सर्वाधिक प्रवासी मिळत असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

२५ डिसेंबर २०१७ रोजी बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली. शनिवार आणि रविवार सोडता अन्य दिवशी या गाडीच्या दिवसभरात सहा फेऱ्या होत होत्या. नाताळची सुट्टी संपल्यानंतर यात आणखी सहा फेऱ्यांची भर पडली आणि दिवसभरात बारा फेऱ्या होऊ लागल्या. मात्र या फेऱ्या सुरू करताना सामान्य गाडीच्या बारा फेऱ्यांवर गदा आल्याने बरीच आरडाओरड झाली. चर्चगेट ते विरापर्यंत २०५ रुपये तिकीट आणि २,०४० रुपये पास वातानुकूलित लोकल प्रवासासाठी आकारण्यात येतात. हा प्रवास बराच महाग असल्याने सामान्य प्रवाशांना परवडणारा नाही, अशीही टीका प्रवाशांकडून करण्यात आली. त्यातच या गाडीच्या काही लोकल फेऱ्यांच्या वेळा योग्य नसल्याचेही प्रवासी सांगू लागले. त्यामुळे या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंका रेल्वेला होती. तसा तो मिळतही नव्हता. या गाडीला प्रतिसाद मिळावा यासाठी सध्याच्या सामान्य लोकल प्रवासाचे प्रथम श्रेणी तिकीट आणि पास व वातानुकूलित लोकलचे तिकीट व पासांतील फरक वसूल करून प्रवाशांना प्रवासास मुभा देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांकडून काही प्रमाणात प्रतिसाद वाढत गेला. परंतु उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतसे या लोकलच्या प्रवाशांमध्ये आणखी वाढ होत आहे.

रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बारा फेऱ्यांपैकी तीन फेऱ्या तर ‘हाऊसफुल्ल’ जात आहेत. बोरिवली ते चर्चगेट- सकाळी ७.५४, विरार ते चर्चगेट-सकाळी १०.२२ वाजताच्या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे रात्री ७.४९ वाजताची चर्चगेट ते विरार गाडीतूनही मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. बोरिवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकातून वातानुकूलित लोकल गाडीला सर्वात जास्त प्रवासी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सरासरी चार हजारांहून अधिक प्रवाशी

वातानुकूलित लोकल गाडीची आसनक्षमता १,०२८ प्रवासी इतकी आहे. तर ४,९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करतात. मात्र सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या तीन फेऱ्यांमधून सरासरी चार हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. हाच प्रतिसाद आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.