‘आयसिस’शी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला कल्याण येथील तरुण अरीब माजीद याला उच्च न्यायालयाने जामीन देण्यास सोमवारी नकार दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्या. रणजित मोरे आणि न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने माजीदने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावत त्याला जामीन नाकारला. नोव्हेंबर २०१४ पासून आपण कोठडीत असून ‘एनआयए’ने आपल्याविरोधात आरोपपत्रही दाखल केलेले आहे. त्यामुळे आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी माजीदने केली होती.