मुंबई : गेल्या आठवडय़ात वाढलेल्या किमान तापमानात गुरुवारी तीन अंशाने घट झाली, तर काही ठिकाणी २० अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. मात्र कमाल तापमानात केवळ एकच अंशाची घट झाली.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिना मुंबईतील किमान तापमानाच्या दृष्टीने अनुकूल असल्याच्या नोंदी आहेत. गेल्या दहा वर्षांतील नोंदींची तुलना केल्यास सर्वात कमी किमान तापमान हे ११.४ अंश असून, २७ डिसेंबर २०११ ला नोंदविण्यात आले. तसेच किमान तापमानाच्या २० अंशाखालील सर्व नोंदी या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात आढळतात.

गेल्या आठवडय़ात तमिळनाडू किनारी झालेल्या निवार चक्रीवादळानंतर राज्यभरात ढगाळ हवामानबरोबरच कमाल तापमानात मोठी घट दिसून आली. मात्र त्यावेळीदेखील मुंबईच्या कमाल तापमानात मोठी घट झाली नाही. त्या दरम्यान वीस अंशावर असलेले किमान तापमान वाढून २४ अंशपर्यंत पोहोचले होते.

गुरुवारी सकाळी साठेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार किमान तापमान घटून सांताक्रूझ, पवई येथे २० अंशापर्यंत घसरले. तर चारकोप, कांदिवली, मुलुंड येथे २१ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. शहराच्या कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांत फारशी घट झाली नाही.