मुंबईमध्ये मान्सून पोहोचण्यास उशीर होणार असला तरी पावसात जनजीवन सुरळीत राहावे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने तयार केलेले मुंबई मान्सून अ‍ॅप’ १ जूनपासून सुरू होत आहे. रविवारपासून ते डाउनलोड करता येणार आहे.
पावसाचा अंदाज घेण्यासाठी पालिकेने शहरभरात ५४ पर्जन्यमापन केंद्र सुरू केली आहेत. तेथील पावसाचे प्रमाण या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून समजणार आहे. विशिष्ट भागात पडत असलेल्या पावसाच्या प्रमाणावरून कोणत्या रस्त्याने जावे वा जाणे टाळावे, याची निवड करण्यास मदत होणार आहे.
वाहतुकीच्या मार्गात होत असलेला बदलही या ‘अ‍ॅप’द्वारा समजणार आहे. पावसासोबत तापमान, आद्र्रता व मुंबई हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला अंदाजही या अ‍ॅपवरून पाहता येणार असून ‘आयओएस’, ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ व विंडो’ प्रणालीवरून हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार आहे.