मुंबई: वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा ऑटो गॅरेज मालमत्ताधारकांवर महानगरपालिकेने शुक्रवारी जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली. या सहा मालमत्ताधारकांनी पालिकेचा एकूण ४५ लाख ३५ हजार ३५९ रुपये कर बुडविला आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याकडून सातत्याने केले जात आहे. करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाने शुक्रवारी टागोरनगर विक्रोळी (पूर्व) परिसरातील सहा मोटार गॅरेज मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली. दरम्यान, हरदीपसिंग धालीवाल (एक लाख ८६ हजार ७०९ रुपये), अवतारसिंग गुरुमितसिंग (दोन लाख हजार २० रुपये), अर्जुनसिंग गुरुमितसिंग (सहा लाख ४ हजार ८७७ रुपये), सुखविंदर कौर धालीवाल (एक लाख ०३ हजार ८४ रुपये ), दारासिंग धालीवाल (२७ लाख ८२ हजार ४९२ रुपये), जगतारासिंग गुरुमितसिंग (सहा लाख चार हजार ८७७ रुपये) यांनी कर थकविला असून यांच्यावर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

आर्थिक वर्ष २०२३-२४ वर्षातील मालमत्ता करभरणा करण्यासाठी २५ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तेसंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शुक्रवारी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) गॅलेक्सी कॉर्पोरेशन ( एच पश्चिम विभाग) – १७ कोटी ६८ लाख ६९ हजार १८७ रुपये

२) फोर्टीन गृहनिर्माण संस्था (के पश्चिम विभाग) – १४ कोटी ५८ लाख ९८ हजार ४९५ रुपये

३) विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्ट्स (एफ दक्षिण विभाग) – १२ कोटी ८८ लाख ८९ हजार ५७१ रुपये

४) शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग) – ११ कोटी ४७ लाख ६५ हजार २५५ रुपये

५) सिद्धार्थ एंटरप्रायझेस (पी उत्तर विभाग) – ९ कोटी ५० लाख २ हजार ६६ रुपये

६) बालाजी शॉपकिपर्स प्रिमायसेस गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग) – ९ कोटी ३८ लाख ७५ हजार ८११ रुपये

७) ओंकार रिअॅल्टर्स अँड डेव्हलपर्स (पी उत्तर विभाग) – ९ कोटी ९ लाख ४० हजार ८४४ रुपये

८) प्रीमियर ऑटो मोबाईल लिमिटेड (एल विभाग) – ८ कोटी ७५ लाख ४९ हजार ६९३ रुपये

९)कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन (एल विभाग) – ७ कोटी ५३ लाख ४६ हजार ५६१ रुपये १०) दामोदर सुरुच डेव्हलपर्स (आर दक्षिण विभाग) – ६ कोटी ५७ लाख ७४ हजार ६३५ रुपये