मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवू, अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. आज सायंकाळच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही धमकी देण्यात आली. या धमकीनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत ताज हॉटेल आणि विमानतळाची पाहणी केली. मात्र, कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – मुंबई : आध्यात्मिक गुरूचा पणतू असल्याचे भासवून डॉक्टरची ४२ लाखांची फसवणूक

एनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आज सांयकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन कॉल प्राप्त झाला. हा कॉल उत्तर प्रदेशातून आला असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे. हा कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. मात्र, तपासादरम्यान त्या ठिकाणी काहीही आढळून आलेलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुंबई पोलिसांना धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. तत्पूर्वी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातही अशाच प्रचार एका फोनकॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.