मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावरुन ते कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा एका नवीन विषयावरुन विद्यापीठाबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, विद्यापीठाने तब्बल ३० परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली असून यात कॉमर्स, मॅनेजमेंटसह आर्टस शाखेतील विषयांबरोबरच सायन्स आणि कायद्याच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठाने आपले सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले आहे. याआधी झालेल्या परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नसताना पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. इतकेच विद्यापीठाने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. यातील काही परीक्षाच्या बदललेल्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून बाकी परीक्षांच्या नवीन तारखा अद्याप सांगण्यात आलेल्या नाहीत.

एमएससी फॉरेन्सिक सायन्स सेमिस्टर-१ची १६ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षाही लांबणीवर पडली असून, ती आता ४ जूनपासून सुरू होईल. बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट, सेमिस्टर-५), बीकॉम (अकाऊंट्स अँड फायनान्स) या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर आर्ट्स शाखेच्या टीवायबीए, एमएच्या परीक्षांसाठीही नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. तीन दिवसांवर आलेल्या बी. कॉम. ची परीक्षा मे महिन्यात होईल. तर १० एप्रिल रोजी होणारा बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट सेमिस्टर ५, फायनान्शियल मार्केट्स सेमिस्टर ५, अकाऊंटिंग अँड फायनान्स)चा पेपर आता २ मे रोजी घेतला जाईल, तसेच १६ एप्रिलपासून सुरू होणारी एमएससीची परीक्षा २ जूनपासून सुरू होणार आहे. १८ एप्रिल रोजी होणारी एमएची परीक्षा २१ मे रोजी होईल. १० एप्रिल रोजी होणारी एमएडची परीक्षा १५ मे रोजी होणार आहे.