राष्ट्रवादीची आजपासून राजधानीत दोन दिवसांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उद्यापासून नवी दिल्लीत सुरू होत असून, त्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना निश्चित केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असून, याचाच भाग म्हणून पुण्याऐवजी नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संमेलन उद्यापासून सुरू होत आहे. ही बैठक जून महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ती लांबणीवर टाकण्यात आली. आता ही नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने यापूर्वी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. २००५ मध्ये सूरतमध्ये झालेल्या राष्ट्रीय संमेलनात तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित  करण्यात आले होते. डेहराडूनच्या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे महत्त्व वाढविण्यावर भर देण्यात आला होता. उद्यापासून सुरू होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी किंवा पवार यांचे महत्त्व कसे वाढेल यावर ऊहापोह केला जाईल.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपेतर पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे यावरून विविध पक्षांमध्ये मतभेद आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास शरद पवार यांच्यासह मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू यांचा विरोध आहे. पवारांनी काँग्रेस किंवा राहुल गांधी यांना उघडपणे विरोध केलेला नाही. पण पंतप्रधानपदाचा निर्णय निकालानंतर सोडविता येऊ शकतो, अशी भूमिका मांडून राहुल गांधी यांच्या नावाला अप्रत्यक्षपणे विरोधच केला आहे. पंतप्रधानपदावरून पवारांची उलटसुलट विधाने लक्षात घेता त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. १९९६ सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास नेतृत्वपदाच्या शर्यतीत पवार हे उतरणार हे स्पष्टच आहे.