मुंबई : अँटिलिया समोर स्फोटके ठेवणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट सट्टेबाज नरेश गौर याला विशेष न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणातील हा पहिलाच जामीन आहे.

गौर याच्यावर या प्रकरणी अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सिम कार्ड पुरवल्याचा आणि कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी गौर याचा जामीन मंजूर केला. या आदेशाला एनआयएने स्थगिती देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य करत आदेशाला २५ दिवसांची स्थगिती दिली. गौर याने अ‍ॅड्. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. वाझे यांना सिम कार्ड पुरवण्यापुरताच आपल्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा गौर याने जामिनाची मागणी करताना केला. आपण निर्दोष असून याप्रकरणी आपल्याला गोवण्यात आले आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ अनुमानाच्या आधारे या प्रकरणी आपल्याला आरोपी बनवण्यात आल्याचा दावाही गौर याने केला होता. शिवाय हिरेन हत्या प्रकरणात आपला सहभाग दर्शविणारा कोणताही पुरावा नाही आणि आपण हिरेन याला भेटलेलो नाही किंवा त्याच्याशी कधी संपर्क साधलेला नाही, असाही दावा त्याने केला होता.